सातारा – अजित पवारांसह ९ राष्ट्रवादी आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर रातोरात पक्षाकडून या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षांना पक्षाकडून पत्र देण्यात आले. या सर्व घडामोडीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही अपात्रतेच्या भानगडीत पडणार नाही. कुठली कारवाई करणार नाही. आम्ही जनतेत जाणार असं म्हटल्याने राष्ट्रवादीत २ मत प्रवाह असल्याचे समोर आले.
सातारा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना पत्रकारांनी ही माहिती दिल्यानंतर ते म्हणाले की, मी आज सकाळपासून बाहेर पडलोय. पक्षाच्या विधिमंडळाचे सर्व अधिकार नेते म्हणून पहिल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अपात्र करायचा की नाही हा अधिकार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. जयंत पाटील हे पक्षाचे शिस्तबद्ध, कायदा जाणणारे नेते आहेत. त्यांनी अपात्रतेबाबत काही निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पक्षाची घटना आणि नियम पाहूनच ते काम करतात असं पवारांनी स्पष्ट केले.
तसेच महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाणसाहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप शरद पवार यांनी केला.
...ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू
मी पंतप्रधानांचे वक्तव्य ऐकलं. ते राष्ट्रवादी काँग्रेसबाबत होते, राष्ट्रवादीचे सहकारी भ्रष्टाचारात सहभागी झालेत असं मोदी म्हणाले. राज्य सहकारी बँक, सिंचन विभागातील गोष्टींचा उल्लेख केला. आज त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते मंत्रिमंडळात सहभागी झाले. म्हणजे पंतप्रधानांचे आरोप वास्तव्य नव्हते. ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. त्याचा मला आनंद आहे असंही शरद पवार म्हणाले.
जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत
आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत अशी तीव्र नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली.