काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदानं स्वीकारली आहे असं वाटत नसल्याचं म्हटलं.
“माहितीनुसार फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदानं स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहराही सांगत होता. पण ते नागपूरचे आहेत. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलंय. तिथे एकदा आदेश आल्यानंतर तो पाळायला असतो, कदाचित असे संस्कार त्यांच्यावर असतील. दुसरं काही कारण त्यात असू शकत नाही,” असं पवार म्हणाले.
शिवसेनेतून जे आमदार गेले त्यांची नेतृत्व बदलाची मागणी होती. एकनाथ शिंदे हे सातारचे आहेत. याआधीही चार मुख्यमंत्री साताऱ्याने पाहिले आहेत. त्यात मी देखील आहे, असे शरद पवार म्हणाले. याचबरोबर पवारांनी आजच्या या घडामोडी आश्चर्यकारक होत्या असंही सांगितलं.
जे. पी नड्डा काय म्हणाले?भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्विकारुन सत्तेत राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या व्हिडीओत जेपी नड्डा म्हणतात की, ''महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी मोठ्या मनाने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आमच्या नेत्याचे चरित्र दिसून येते. आम्हाला पदाची लालसा नाही, हे यातून स्पष्ट होते,'' असे नड्डा म्हणाले.