विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी आग्रही भूमिका घेणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अधिकच आक्रमक झाले आहेत. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजपा नेतेही जरांगेंविरोधात आक्रमक झाले असून, नारायण राणेंसह भाजपामधील इतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना टीकेचं लक्ष्य करत आहेत. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विरुद्ध राणे कुटुंबीय, अशी आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, आपल्यावर टीका करत असलेल्या नारायण राणे यांच्या मुलांना आपण किंमत देत नसल्याचा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.
नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी नारायण राणेंच्या पोरांना किंमत देत नाही. इतडे त्यांना कोण विचारतं? मी निलेश साहेबांना तीन चार वेळा सांगितलं की, मी राणे कुटुंबीयांचा सन्मान करतो. तुमचं काही ना काही तरी योगदान आहे. वय मोठं आहे. त्यांना समजून सांगा. मी त्यांचा सन्मान करतो. मी त्यांना एक शब्दही उद्देशून बोललेलो नाही. मग तुम्ही बळेच मला कशाला बोलता आणि बळेच बोलल्यावर मी कसा काय सोडीन. मी शब्द वापरलाच नाही. तरी तुम्ही मला बोलता. आता कारण नसताना मी बोललो तर ते मला उलट बोलणारच ना. त्यामुळे कारण नसताना तुम्ही मला आणि समाजाला बोलला तर उत्तर मिळणारच ना? त्यामुळे समाजाविरुद्ध बोलू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, भाजपाविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यापासून राणे कुटुंबीयही जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. परवा नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक जिना असा केला होता. नितेश राणे म्हणाले होते की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एक तरी मराठा समाजातील तरुणाचा फायदा झाला असेल तर त्याचा हिशोब आम्हाला द्यावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाचा फायदा अधिक झाला आहे. मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना असा प्रश्न घराघरांमधून विचारला जातोय. ते जेव्हा गोधडीत होते. तेव्हा नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे. आम्हाला आव्हान आव्हान देऊ नका. तुमच्या शाळेचे नारायण राणे हे प्राध्यापक आहेत, असा टोला नितेश राणे यांनी दिला होता.