मुंबई - दिवाळीनिमित्त आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास भाष्य केले. मी सागर बंगल्यावरच खुश आहे. इथे खूप सकारात्मकता आहे असं सांगत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर दिले आहे. राज्याच्या राजकारणात भाजपानं सत्तांतर घडवलं परंतु उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना शपथ घ्यायला लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मुख्यमंत्रिपदी काम केल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावणं हे अपमानास्पद आहे असं विरोधकांकडून सातत्याने फडणवीसांवर टीका होत होती.
देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) आज विविध प्रश्नावर भाष्य केले. त्याचसोबत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर फडणवीसांनी म्हटलं की, राज्यमंत्री लवकर केले नाहीत तर कारभारावर त्याचा त्रास होतो त्यामुळे विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी झोपतात हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. कारण पहाट असो वा रात्र शिंदे सातत्याने विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात यावर फडणवीस बोलत होते. यावेळी पत्रकारांनी तुम्हाला राग येतो का असा प्रश्न केला असता फडणवीसांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली.
मला जेव्हा भूक लागते तेव्हाच मला राग येतो असं फडणवीसांनी सांगितले. सध्या राजकारणात कटुता वाढली आहे हे वास्तव आहे. डोक्यावरील केस गेले तर समजायचं तुम्ही गृहमंत्री म्हणून चांगले काम केले. माझ्याकडे खूप सहनशक्ती आहे हे २५ वर्षात तुम्ही पाहिलं असेल. दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलं असेल तोच अंक मी वाचतो. आमचा पायाभूत सुविधांवर भर आहे. आम्ही मुंबादेवी कॉरिडोर उभारणार आहोत असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.