मी चॅलेंज देऊन सांगतो अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत : संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 07:16 AM2023-08-28T07:16:05+5:302023-08-28T07:16:17+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले.
मुंबई : अनेक लोक म्हणतात की, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार; पण मी चॅलेंज देऊन सांगतो की, अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे माजी खासदार स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने भाजपाला लक्ष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले. ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते, त्यांनाच आता सोबत घेतले आहे. राज्यातील जनतेची अशा युतीने मती गुंग झाली आहे; पण हे तीन पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाहीत. हे पक्ष लोकसभेपुरते एकत्र आले आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार गट पुन्हा शरद पवार गटात सामील होईल, असे भाकीतही त्यांनी केले. या राजकीय परिस्थितीच्या विरोधात स्वराज्य पक्ष लढा देईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नऊ मंत्री पुन्हा पवारांसोबत जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नऊ मंत्री भाजपसोबत आले आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. ते परत एकदा मोठ्या साहेबांसोबत म्हणजे शरद पवारांसोबत जाणार असल्याचा दावाही संभाजीराजे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण, शिवस्मारकाचे काय झाले?
भाजपाने मराठा समाजाला मराठा आरक्षण, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप गप्प आहे, तर शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून नऊ वर्षे झाली तरी अजून हे स्मारक का होत नाही? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी केला.