बारामती : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत गेले काही दिवस शेतकरीआंदोलन सुरु आहे. आतापर्यंत केंद्र सरकार व शेतकरी यांच्यात आठ ते दहा बैठक झाल्या आहेत . मात्र त्यातून काही तोडगा निघाला नाही. यावरून देशातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर मोठे भाष्य केले आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि. १८) पासून कृषि तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला आहे. १८ ते २४ जानेवारी दरम्यान हा सप्ताह पार पडणार आहे. त्याअंतर्गत माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यावस्थापन संस्थेमध्ये आयोजित दुष्काळ निवारण यंत्रणा या चर्चासत्रामध्ये पवार बोलत होते.
पवार म्हणाले, पंजाबमध्ये गहू आणि तांदळाचे जास्त उत्पादन होते. त्यामुळे गहू आणि तांदळाच्या दर, विक्री व विपणन व्यवस्थेबाबत तेथील प्रश्न मोठे आहे. सध्या दिल्लीचे शेतकरी आंदोलन देखील या प्रश्नांमुळे सुरू आहे. शेतकऱ्यांना बाजाराचा अभ्यास असणे आवश्यक आहे. मी कृषिमंत्री असताना पंजाबच्या शेतकऱ्यांना गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करू त्याठिकाणी डाळी व फळबागा लागवडी वाढवण्यासाठी आवाहन केले होते. मात्र त्याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
कृषिक्षेत्राबाबत विविध राष्ट्रीय संशोधन संस्था मोलाची कामगिरी पार पाडत आहेत. मात्र या संस्थांना प्रादेशिक स्थितीबाबतची माहिती कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर शेतकऱ्यांना सोयी सुविधा पुढील काही कालावधीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा शेतमाल स्वत: विकू शकेल. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सध्या निधीची कमतरता आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढवणाऱ्या राज्यातील ५ हजार शेतकऱ्यांना एकत्रित करून शासनाने रिसोर्स बँक स्थापन केली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रयोगांचा आणि संशोधनाचा शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होणार आहे.
तत्पूर्वी भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी व्हिडीओ कॅलिंगद्वारे संवाद साधला. तसेच भारतीय कृषि संशोधन परिषद, राष्ट्रीय अजैविक ताण व्यावस्थापन संस्थेच्या तत्रज्ञ व शास्त्रज्ञांनी दुष्काळा निवारण, मृदा सर्व्हेक्षण व भूमी वापर नियोजन, दुष्काळाशी सामना करणारा तंत्रशुद्ध दृष्टीकोन आदी विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. तत्पूर्वी शरद पवार यांच्यासह उपस्थित मंत्री, अधिकारी व संशोधकांनी संस्थेच्या परिसरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांना व उपक्रमांची पाहणी करण्यात आली. तसेच येथील डेअरी प्रकल्पाला देखील भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मृदा व जलसंवर्धन मंत्री शंकरराव गडाख, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, आमदार विश्वजित कदम, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.---------------------