गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यानंतर आता देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
"मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण मी माझ्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षाशी असलेलं 55 वर्षे जुने नाते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांची सेवा करणं आहे. शिंदे हे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. जमिनीवरचे नेते आहेत. जनतेच्या वेदना, आकांक्षा मुख्यमंत्र्यांना माहिती असतात."
"मुंबई, महाराष्ट्रासाठीची त्यांची दृष्टी खूप मोठी आहे आणि म्हणून त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात शिवसेनेच्या माध्यमातून मला बळकट करायचे आहेत. माझे वडील मुरली देवरा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईचे महापौर झाले. मुरली देवरा आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीला नगरसेवक म्हणून सुरुवात केली. मुरली देवरा केंद्रीय मंत्री झाले, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. राजकारणात जनसेवा आणि लोकसेवा महत्वाची आहे" असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं.
"माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी मला शिंदे यांनी पक्षात प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं. शिंदे साहेबांना मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. मी खासदार बनून मी चांगलं काम करू शकतो, असं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं मत आहे. त्यांनी विश्वास टाकला. त्याबद्दल आभार मानतो. माझ्यासोबत काही मराठी भाषिक, काही हिंदी भाषिकही आहेत."
"सकाळपासून अनेक लोकांचा फोन येत आहे. तुम्ही कुटुंबासोबतचं नातं का तोडलं असं सांगितलं जात आहे. मी पक्षाच्या आव्हानाच्या काळातही पक्षाशी निष्ठावंत राहिलो. पण दुखाची गोष्ट म्हणजे आजची काँग्रेस आणि 1968च्या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे. मेरिट आणि योग्यतेला काँग्रेसने महत्त्व दिलं असतं तर मी आणि एकनाथ शिंदे येथे बसलो नसतो."
"एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यावा लागला. मलाही घ्यावा लागला. 30 वर्षापूर्वी मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री असताना आर्थिक सुधारणा केली होती. त्यावेळी काँग्रेसने उद्योगपतींना शिवीगाळ केली. आज हीच पार्टी मोदींच्याविरोधात बोलत आहे. उद्या मोदींनी काँग्रेस चांगला पक्ष आहे असं म्हटलं तर त्यालाही विरोध करतील" असं देखील मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.