Manda Mhatre Ganesh Naik : नवी मुंबईतील दोन भाजप आमदारांमध्येच पुन्हा राजकीय संघर्ष पेटताना दिसत आहे. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना घोटाळ्याची फाईल काढण्याचा इशारा दिला आहे. पक्षातील दोन आमदारांमुळे भाजपची ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कटकट वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. अशात नवी मुंबईतील म्हात्रे विरुद्ध नाईक संघर्ष भाजपची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता दिसत आहे. कारण मंदा म्हात्रे यांनी नाव न घेता आमदार गणेश नाईक यांना इशारा दिला आहे.
मंदा म्हात्रे गणेश नाईकांबद्दल काय म्हणाल्या?
नवी मुंबईतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांना नाव न घेता इशारा दिला.
"हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या कामात अडथळा आणल्यास आंदोलन करणार", असे सांगत आमदार म्हात्रे यांनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा दिला.
"कामात आडवे आलात तर भांडाफोड करेन"
आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, "कोविड काळातील सर्व फाईल्स माझ्याकडे आहेत. या काळात कोणत्या कंत्राटात कोणी किती पैसे लुटले, हे बाहेर काढेन. माझ्या कामात आडवे याल तर भांडाफोड करेन", असा इशारा त्यांनी गणेश नाईक यांना नाव न घेता दिला.
संदीप नाईकांवर केली होती टीका
गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत. संदीप नाईक भाजपचे जिल्हाध्यक्षही आहेत. संदीप नाईक यांनी विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना मंदा म्हात्रेंनी "तुझ्या बापाला हरवले आहे, तू कोण?", असे म्हणत ललकारले होते.
गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे सध्या एकाच पक्षात आहेत. असे असले तरी पूर्वीपासूनचा त्यांच्यातील राजकीय संघर्ष भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला सोडवता आलेला नाही. त्यात आता हा वाद पुन्हा चिघळताना दिसत आहे.