लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यापासून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेची धार कमालीची वाढली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे बोचरी टीका करत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना टोला लगावला आहे. मी उद्धव ठाकरे यांना टोमणे बहाद्दर ही एकच उमपा दिलीय. ती सार्थ ठरवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करताहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी त्यांना एकच उपमा दिली आहे, टोमणे बहाद्दर. मी दिलेली उपमा कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करताहेत. देवेंद्र फडणवीसांनी दिलेली उपमा सार्थच ठरवली पाहिजे, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते सारखे टोमणे मारत असतात. काही तरी बोलत असतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माझं एकच म्हणणं आहे की, उद्धव ठाकरे यांनी एक वाक्य विकासावर बोलावं. ही निवडणूक सामान्य माणसाला त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार सरकार निवडून देण्यासाठी आहे. आम्ही हे करू, आम्ही ते करू असं एकतरी काही सांगा. अद्वातद्वा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे, मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे, या व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काही नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.