चिंचवड : गुरुवार रात्री १०.३०ची वेळ. सर्व परिसरात शांतता पसरलेली... चिंचवड बिजलीनगर... नक्षत्रम सोसायटीचा परिसर... दीड महिन्याच्या बाळाला उराशी धरते... बेवारस अवस्थेत सोडून निघून जाते... सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या सुरक्षारक्षकाच्या नजरेस ते बाळ पडते... त्यासोबत महिला एक चिठ्ठीही सोडते.चिठ्ठीत असा उल्लेख केला आहे की, ‘‘माझा मुलगा साईला मी सोडून जात आहे. माझ्या काही वैयक्तिक अडचणी आहेत. त्यामुळे माझ्या मुलाची काळजी घ्या. मी त्याचा सांभाळ करू शकत नाही. मी परत मुलाला घेऊन जाईल. तुझे अभागी आई-वडील.’’ सुरक्षारक्षकाने महिलेला पाहिले होते. त्यानंतर सुरक्षारक्षकाची नजर चुकवून ती महिला तेथून पलायन करते. घडलेली घटना सोसायटीत सांगितल्यानंतर तेथील रहिवाशांना समजताच सर्व नागरिक त्या ठिकाणी धाव घेतात. सोसायटीच्या बाकडावर त्या बाळाला ठेऊन बाळ सुरक्षित आहे का, याची नागरिकांनी पाहणी केली. चिंंचवड पोलीस स्टेशनला फोन करून घडलेला प्रकार नागरिक सांगतात. पोलीस घटनास्थळी धाव घेतात. मुलाबरोबर त्याचे कपडे, औषध व काही इतर साहित्य पोलीस ताब्यात घेतात. त्यानंतर बाळाला तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात नेतात. बाळाला मात्र याची जराशीही चुणूक नव्हती. बाळ अगदी निरागसपणे हसत होते. दोन तासांनी ते रडू लागले. त्यानंतर मात्र सर्वांचीच धांदल उडाली. अगदी गुटगुटीत व हसऱ्या चेहऱ्याच्या बालकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांच्या डोळ्यांतही मात्र अश्रू तराळले. सर्वांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झाला की, अवघ्या दीड महिन्याच्या बालकाला या मातेने का सोडून दिले असावे? त्यानंतर बालकासाठी पूर्ण वेळ एका केअरटेकर महिलेची नियुक्ती करण्यात आली. वायसीएममधील स्वयंसेवी संस्था रिअल लाइफने बाळाची दखल घेतली. संस्थेचे समाजसेवक एम. ए. हुसैन यांनी बालकल्याण समितीशी संपर्क साधला आहे. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाळाला संबंधित संस्थेकडे स्वाधीन केले गेले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधिकारी मनोज देशमुख, विनायक पाटील, सोशल वर्कर महादेव बोथरे, डॉ. शिल्पा रावळे, पीएसआय आर. पी. बागूल यांनी वेळेत दखल घेतल्याने बाळ सुखरूप अवस्थेत आहे. त्याच्या आहाराची काळजी घेतली जात आहे. या बाळाचे जन्मदाते कोण हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.(वार्ताहर)
आई गेली परदेशी, बाबा गेला दूरदेशी...
By admin | Published: March 26, 2016 3:11 AM