पंकजा मुंडेंच्या ताब्यातील साखर कारखान्यावर जीएसटीने कारवाई केल्यामुळे पंकजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावर त्यांनी राज्य सरकारने आपल्या कारखान्याला मदत केली नसल्याचे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी कारखाना संकटात असून या चिंतेमुळे आपले ९ किलोने वजन कमी झाल्याचा खुलासा केला आहे.
आम्हाला आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले होते. कारखाना खूप अडचणीत आहे. मी आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात आहे. मी रोज बँकांच्या पाया पडत आहे. आजारी उद्योगांना मदत करायचे, हे सरकारचे धोरण नव्हते, पण काही ठराविक कारखान्यांना मदत करण्यात आली. आमच्या कारखान्याने देखील अर्ज केला होता, परंतू मदत दिली गेली नाही, असा आरोप पंकजा यांनी केला आहे.
कदाचित मदत मिळाली असती तर मी या पैशांची परतफेड करू शकली असते, असे शल्य पंकजा यांनी बोलून दाखविले. साखर कारखान्याला नोटीस आलली नाही तर ती जीएसटीच्या वसुलीची कारवाई होती. आकड्यांमध्ये तफावत होती. कारखाना नुकसानीत असल्याने आम्ही त्याचे पैसे भरू शकलो नाही, हे सत्य असल्याचे पंकजा यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
एखादी स्त्री जेव्हा एखाद्याला आपलं मानते, तेव्हा ती एकनिष्ठ असते. माझ्या पक्षाबद्दल माझी भूमिका देखील अशीच आहे. मला माहिती नाही, लोक कसे पक्ष बदलतात. हे एवढं सोपं आहे का? पंकजा मुंडे पक्ष आणि परिवार यात भेद करत नाही. मला डॅमेज करण्यासाठी माझ्यावर महत्त्वाकांक्षा लादली गेली. माझ्यासमोर पर्याय होते. मात्र, मी खंबीर राहिले, असे पंकजा यांनी अद्यापही भाजपात असल्याच्या प्रश्नावर उत्तर दिले.