अमरावती : हल्ली देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष हा भाजप आहे. या पक्षानेच मला मंत्री, आमदार केले. त्यामुळे भाजप सोडण्याचा विचारही मनात येत नाही. मी भाजप सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वृत्त निराधार असून, मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेतून केला.
आमदार प्रवीण पोटे यांच्या माहितीनुसार, येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे. यात जिल्हा व महानगरात भाजप सत्तेत येणार हे निश्चित आहे. त्यामुळे आतापासून काहींनी बदनाम करण्यासाठी मी भाजप सोडणार, हे पिल्लू बाहेर काढले आहे. माझी राजकीय वाटचालही भाजपतून सुरू झाली आणि भाजपच असेल, असा दावा आमदार पोटे यांनी केला. हिंदुत्व विचारसरणी अंगीकारली आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांना सुद्धा माझ्यावर तितकाच विश्वास आहे. त्यामुळे मी भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार हे वृत्त निराधार, कपोलकल्पित असल्याचे आमदार पोटे यांनी सांगितले. अधिवेशन काळात भाजपच्या सर्व कार्यक्रम, आंदोलनात सहभागी झालो. मध्यंतरी भाजपच्या आंदोलनात सहभागी होतो. गुन्हे देखील दाखल झाले.
सध्या देश, राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असताना अमरावतीत नख लावण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप आमदार प्रवीण पोटे यांनी केला. राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी वृत्त प्रकाशित करून भाजपला काहीही फरक पडत नाही, असा टोलाही आमदार प्रवीण पोटे यांनी लगावला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, डॉ. नितीन धांडे, तुषार भारतीय, जयंत डेहनकर, रवींद्र खांडेकर, सुनील काळे आदी उपस्थित होते.