26/ 11 हा भारतातला नाही तर जगामधला काळा दिवस समजला जातो. 26/ 11 मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांना वंदन करते, त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप आहोत. त्यांच्या कुटुंबाने त्याग केला. हा दिवस मुंबई नाही तर जग कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली.
तसेच राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावरील दगडफेक प्रकरणी मास्टरमाईंड बेदरे याला अटक झाली आहे, त्याचे फोटो शरद पवारांसोबत असल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे देखील अनेक लोकांसोबत फोटो आहेत असे उत्तर दिले.
तसेच मी महाराष्ट्राचा दुष्काळ आणि बेरोजगारीच्या विषयांवर व्यस्त असते, दुसऱ्यांच्या घरात बघायला मला वेळ नाही. शेतकऱ्यांची मुलाखत पहिली, ते म्हणाले आमची किडणी घ्या, लिव्हर घ्या पण आम्हाला अनुदान द्या. आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 रुपयांनी दर कमी केला जातो, अशी टीका सुळे यांनी केली.
मी जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली नाही. प्रकाश आंबेडकर हे या देशाचे मोठे नेते आहेत. ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये झाल्या पाहिजे त्या गोष्टी रस्त्यावर होत आहेत, असे सुळे म्हणाल्या.