'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:00 PM2024-02-27T13:00:11+5:302024-02-27T13:16:11+5:30

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'I have not taken Sharad Pawar's help, let everyone be investigated'; Said that Manoj Jarang | 'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन सभागृहात गोंधळ सुरू झाला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यांची चौकशी होऊ द्या. हे मला गुंतवण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. आतापर्यंत त्यांना एवढा निष्ठावंत आंदोलक भेटला नाही, त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे. आमच्या आई-बहिणीच्या छाताडावर तुम्ही नाचले तेव्हा काही वाटलं नाही का?, मी नुसतं आई म्हटलं तर ते कसे लागले?, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. मराठ्यांनो आई बहिणीचे रक्षण करा. जातीसाठी उभे रहा. मी मरायला घाबरत नाही. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देणारच, असं मनोज जरांगेनी सांगितले.

फक्त मुलगा म्हणून सर्वजण माझ्या पाठीमागे उभे रहा. समाजासाठी मरण येणं यासाठी खूप भाग्य लागते. मराठ्यांसाठी मी मरायला तयार आहे. जाळपोळ करणारी व्यक्ती आपली नाही. शांततेत आंदोलन करणारे आपले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच शरद पवार यांच्याशी कधी बोललो नाही. मी त्यांची मदत घेतली नाही. मी निष्ठा विकू शकत नाही. तुमच्या सत्तेसाठी मी मराठ्यांना का फसवू?, असं म्हणत मनोज जरांगेंनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मनोज जरांगेंनी आज छत्रपती संभीजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

कोणाचीच आम्हाला मदत नाही-

शरद पवार, प्रवीण दरेकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश आंबेडकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, हरिभाऊ राठोड, पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्यापौकी कोणाचीच आम्हाला मदत नाही. यांचा पाठिंबा आम्हाला आहे. पाठिंबा द्यावाच लागेल, कारण आम्ही जनता आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. 
 

जरांगे पाटलांनी बोललेली भाषा कुणाची?- CM शिंदे

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काम करणारे होते त्यांनी पुढे आणले. कुठल्याही गोष्टी लपत नाही. दगडफेक झाली त्याचाही अहवाल समोर आला आहे. आतापर्यंत सरकार सहानुभूती ठेवली होती. जाळपोळ करायला लागले, आमदारांची घरे जाळली. मालमत्तेचे नुकसान केले. अशा परिस्थितीत सरकारने हातावर हात ठेऊन गप्प बसायचं का?  प्रामाणिकपणे आंदोलन होते, तोपर्यंत मुख्यमंत्र्यापासून सगळे गेले. पण कायद्याच्या बाहेरची मागणी करणे हे योग्य आहे का? देवेंद्र फडणवीसांबाबत जे जरांगे पाटील बोलले ती भाषा कुणाची आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

देवेंद्र फडणीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरु झाले- CM शिंदे

देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत सारथी सुरू झाले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला. शहरी ग्रामीण भागात निर्वाह भत्ता वाढवला. मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सवलती दिली. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे समाजासाठी आंदोलन करत होता. तेव्हा मी एकदा नव्हे दोनदा उपोषणस्थळी गेलो. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले असताना तिकडे गेलो. पण जरांगे पाटील यांच्याशी देणंघेणं नाही. परंतु सरकारवर टीका करणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचीही काढली. सरकार म्हणून विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला. फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केलेत. ही भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय पक्षाची भाषा आहे असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. 

Web Title: 'I have not taken Sharad Pawar's help, let everyone be investigated'; Said that Manoj Jarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.