Anna Hazare ( Marathi News ) : गुरुवारी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी अटक केली. यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. आज सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'केजरीवाल यांनी माझे ऐकले नाही याचे मला वाईट वाटते, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.
"अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनल्यानंतर मद्य धोरणाबाबत मी त्यांना दोन वेळा पत्र लिहिले होते. मला दु:ख याचं वाटतं त्यांनी माझं ऐकलं नाही आणि आता त्यांना अटक झाली. केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आमच्यासोबत होते तेव्हा मी म्हटले होते की, त्यांनी नेहमी देशाच्या हितासाठी काम केले पाहिजे. पण त्यांनी हे लक्षात ठेवले नाही, असंही अण्णा हजारे म्हणाले.
अण्णा हजारे म्हणाले, आता मी त्यांना कोणताही सल्ला देणार नाही, कायदा आणि सरकारला जे काही करायचे आहे ते करा.
दिल्लीचे नवीन मद्य धोरण नोव्हेंबर २०२१ मध्ये लागू करण्यात आले होते. मात्र हे धोरण सुरुवातीपासूनच वादात राहिले. नंतर, दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना एक अहवाल सादर केला, यामध्ये मद्य धोरणात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे.