गेल्या १०-१५ वर्षांपासून मी बारामतीवर लक्ष दिलेले नाही; अजितदादांच्या 'माझे ऐका'ला शरद पवारांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 02:02 PM2023-12-25T14:02:58+5:302023-12-25T14:04:10+5:30
Ajit pawar vs Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिवाळीत पाच-सहा वेळा एकत्र कौटुंबिक कार्यक्रमांत भेट झाली. त्यांच्यातील बंडाचे फटाके आताकुठे फुटू लागले आहेत.
Ajit pawar vs Sharad Pawar ( Marathi News ): राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिवाळीत पाच-सहा वेळा एकत्र कौटुंबिक कार्यक्रमांत भेट झाली. त्यांच्यातील बंडाचे फटाके आताकुठे फुटू लागले आहेत. अजित पवारांनी थेट बारामतीकरांना बरीच वर्षे त्यांचे ऐकले आता माझे ऐका असे सांगत शरद पवारांविरोधात थेट बारामतीत लढाई सुरु केली आहे. इथून पुढे माझं ऐका. कुणाचेही ऐकू नका. मी वयाच्या 60 व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर ३८ व्या वर्षीच घेतला होता अशा शब्दांत अजितदादांनी काकांवर वार केले आहेत.
यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी देखील पुतण्याला थेट प्रत्यूत्तर दिले आहे. वसंतदादा पाटील चांगलं काम करत असताना त्यांनीही बाजूला सारण्यात आलं होतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. गेल्या १० ते १५ वर्षांपासून बारामती आणि परिसरावर माझे लक्ष असत नाही, असे सांगत अजित पवारांच्या माझे ऐकावर प्रत्यूत्तर दिले आहे.
बारामती भागात साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कोणी जावे आणि कोणाला जबाबदारी द्यावी यात मी लक्ष घातले नाही. गेल्या दहा वर्षांत एकाही गोष्टीत मी लक्ष घातले नव्हते. तसेच कोणाला काम करण्यात अडचणीही आणल्या नाहीत. परिसराचा नावलौकिक वाढेल याची काळजी घ्यावी, असा टोला पवारांनी हाणला. तसेच कोणी कोणाचे ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नेहमी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच पवारांनी मी ३८ व्या वर्षी जे केले ते बंड नव्हते, असे स्पष्ट केले आहे. आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतलेला. आज कोणी काही केले असेल तर त्याबद्दलही तक्रार करण्याची गरज नाही. पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नसल्याचे शरद पवार म्हणाले.