Eknath Khadse BJP NCP : आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये बॅनर झळकले. या बॅनरवर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो होते. त्यामुळे खडसे कोणत्या पक्षात आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ अखेर खडसेंनी दूर केला. भाजप प्रवेशाबद्दल माहिती देताना खडसेंनी एक दावाही केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, "भाजपमध्ये प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहीन आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय होईल."
आता मला निर्णय घ्यावा लागेल -एकनाथ खडसे
"भाजपमध्ये प्रवेश करावा असे माझे मत पूर्वीपासून होते. काही कारणे त्याची होती. त्या कारणांची मीमांसा जयंत पाटील आणि शरद पवारांकडे केली. माझ्या काही अडचणी होत्या. पण, आता अशा स्थितीत मला विचार करावा लागेल. भाजपचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणे आवश्यक आहे."
"जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही", असा धक्कादायक दावा खडसेंनी केला आहे.
प्रवीण दरेकरांची एकनाथ खडसेंवर टीका
"एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल निर्णय झालेला नाही. पण, जळगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा त्यांच्या प्रवेशावर आक्षेप आहे. भाजप ही काही ये जा करणाऱ्यांचा पक्ष नाही. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही पक्षात येणार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही राष्ट्रवादीत जाणार हे अभिप्रेत नाही", अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला आले होते. त्यावेळी खडसेंना अपेक्षा असेल की, मला बोलावतील, पण हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपचे उत्तर महाराष्ट्रात संघटन मजबूत आहे. या गोष्टींचा विचार करून पक्ष निर्णय घेत असतो. खडसेंनी काय निर्णय घ्यावा, तो त्यांचा विषय आहे. पण, ते राजकीय गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत", असा टोला दरेकरांनी लगावला आहे.