राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील, असे वक्तव्य भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केले होते. महायुतीत अशी चर्चा आहे, असे ते म्हणाले होते. यावर वडेट्टीवार यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. नितेश राणेंना एक आठवण करून दिली आहे.
मला कोणाच्याही ऑफरची आणि सत्तेची भुक नाही. आधी नितेश राणे यांनी मंत्री व्हावे. वारंवार जे पक्ष बदलतात त्यांच्या मुखातून हेच येणे हे स्वाभाविक आहे. मी काँग्रेसचा प्रामाणिक शिपाई आहे, पक्षाशी माझी बांधिलकी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
नारायण राणे यांच्यासोबतच मी काँग्रेसमध्ये आलो होतो. नारायण राणे यांची भूमिका वेगळी बनली तेव्हा मी काँग्रेसमध्येच राहण्याची भूमिका घेतली. मी आहे त्या ठिकाणी राज्यातील प्रश्न घेऊन सरकार विरोधात लढण्यासाठी सशक्तपणे उभा आहे. मला कोणाच्याही ऑफरची हाव आणि भूक नाही. मला सत्तेची भूक नाही, असे जोरदार प्रत्यूत्तर देत वडेट्टीवार यांनी नितेश राणेंना तेव्हाची आठवण करून दिली.
नितेश राणे काय म्हणालेले...आमदार नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरतायेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. विरोधी पक्षनेते हे हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे असं सांगत त्यांनी पटोले-राऊतांना टोला लगावला होता.