Devendra Fadnavis : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून राज्यात बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर पाच वर्षाच्या काळात दोनवेळा सत्तांतर झालं. या सगळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच चर्चेत राहिले होते. २०१९ साली सर्वात जास्त जागा मिळवून देखील सत्ता स्थापन करता आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो असं विधान केलं. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.
मार्च महिन्यात एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन या वाक्याबाबत भाष्य केलं होतं. मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे होत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण हे गमतीने बोललो असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपने सुरुवातीला दोन्ही पक्ष फुटले त्याच्याशी आमचा काही संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो असं विधान केले होते. या विधानाचा लोकसभेत फटका बसला का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"मी ते एकदाच बोललो आणि गंमतीत बोललो. पण इको सिस्टमने पकडलं आणि तेच चालवलं. पण ठीक आहे ते त्यांचं काम आहे. पण आम्ही हे सातत्याने सांगितलं की, कोणी कोणाचा पक्ष फोडू शकत नाही. त्या-त्या पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे आणि पवार साहेबांकडे ज्या वेळेस शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षात आमचं कोणतंही भविष्य नाही. कारण इकडे आदित्य ठाकरेंना भविष्य आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंना भविष्य आहे. त्यांची कुचंबणा व्हायला लागली होती. ज्या गोष्टींसाठी पक्षात आहोत किंवा जी विचारसरणी आपण सांगतो त्याच्या विरोधात आपण करत आहोत. अशा अनेक गोष्टी घडल्या यामुळे ते पक्ष फुटले," असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.