मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले विदर्भातील नेते नाना पटोले यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी समोर करण्यात आले आहे. आगामी काळात भाजपने सरकार पाडण्यासाठी काही प्रयत्न केल्यास, विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत पटोले भाजपशी सहज दोन हात करू शकतील, असा हेतू समोर ठेवून काँग्रेसने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे सांगण्यात येते. पटोले यांनी देखील आपला बाणा माध्यमांशी बोलताना दाखवून दिला आहे.
साकोली मतदार संघातून आमदार असलेले पटोले यांनी आपल्याला अध्यक्ष होण्याची संधी महाराष्ट्रातील जनेतेला न्याय देण्यासाठी मिळाल्याचे म्हटले. यावेळी, तुमच्या समोर मजबूत विरोधी पक्ष असल्याचे त्यांना विचारण्यात आले. त्यावर पटोले म्हणाले की मी विरोधकांना चांगलच ओळखतो. बराच काळ मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यामुळे विरोधकांचा आपल्याला काहीही फरक पडत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पटोले यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर अनेकदा टीका केली आहे. आता विधानसभेत भाजप आणि पटोले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे.