औरंगाबाद - भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर प्रहार केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. नारायण राणे काँग्रेसमध्ये कशाला गेले? तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन आमदार कसे झाले? तुम्ही मरायला गेले होते का? असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारत राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपात आहे. मध्ये त्यांचा पक्ष काढला. अजून किती पक्ष बदलणार. नारायण राणेंचा संपूर्ण इतिहास मला माहिती आहे. आम्ही एकत्रच विधानसभेत आलो होतो. राणे काय बोलतायेत. त्यांची मुले काय बोलतायेत. कुणामुळे मोठा झाला. मला सगळं काही माहिती आहे. मी जर बोललो तर अपमान होईल असा इशारा चंद्रकांत खैरेंनी दिला आहे.
शिवप्रेमींनी सरकारला जाब विचारायला हवा छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे दैवत आहे. शिवप्रताप दिन साजरा करायला हवा. पण राज्यपाल छत्रपतींबाबत अपमानास्पद बोलतात. त्यांच्यावर कारवाई केली नाही. उदयनराजे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. इतके असूनही राज्यपालांवर कारवाई होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शिवप्रेमींनी सरकारला जाब विचारला पाहिजे असं आवाहनही खैरे यांनी केले आहे.
कामाख्या देवीला जाण्याऐवजी...कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद अनेक वर्ष प्रलंबित आहे. संसदेतही आम्ही यावर आवाज उचलला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सीमाप्रश्नाचा मुद्दा उचलला. बाळासाहेब ३ महिने जेलमध्ये होते. ६९ शिवसैनिक मृत्यूमुखी पडले होते. महाराष्ट्र पेटला असून त्यावेळी बाळासाहेबांनी जनतेला त्रास होऊ नये यासाठी आंदोलन मागे घेतले. संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्वपक्षीय आंदोलन झाले त्यावेळीही अनेक हुतात्मे झाले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं दिल्लीत काय काम? सुप्रीम कोर्टातील सुनावणीवेळी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायेत का? कामाख्या देवीला जाण्याऐवजी दिल्लीत जाऊन सीमाप्रश्न सोडवावा यासाठी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करायला हवा होता. भाजपाची दोन्ही राज्यात सत्ता आहे. त्यांनी हा प्रश्न सोडवायला हवा असं सांगत चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
बावनकुळेंना प्रत्युत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी वर्षावर बैठका घेऊन महाराष्ट्र वाचवला, कोरोनामुक्त केला. हे नागपूरवाल्यांना कळत नाही. आदित्य ठाकरेंनी पुरावे दाखवून आरोप केले. महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करत आहेत. आदित्य ठाकरेंसारखा नेता पुराव्यासकट बोलतोय. त्यांच्यावर टीका करतायेत असं सांगत खैरेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"