मी 2017 मध्ये आजारी होतो, तेव्हा जे 6 नगरसेवक यांनी चोरले आणि हे खोके खोके बोलतात, यांनी तेव्हा किती खोके दिले होते, हे मलाही माहीत आहे. कारण जे सातवे संजय तुर्डे गेले नाहीत, त्यांनाही तो फोन आला होता, असा गौप्यस्फोट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला आहे. अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत डॉट कॉम'ला दिली. यावेळी, लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांच्या प्रश्नांना त्यांनी 'मनसे' उत्तरं दिली.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत शेवटचं केव्हा बोललात? या प्रश्नावर अमित म्हणाले, "मला आठवत नाही केव्हा बोललो ते. आता कसे झाले की, दोन वेळा साहेबांनी प्रयत्नही केला, युती व्हावी, दोन भाऊ एकत्र यावेत यासाठी साहेबांनी पुढाकार घेतला. पण त्यानंतर काय झाले, हे साहेबांनीच तुम्हाला सांगितले. पण कसं झालं की, 2017 मध्ये मी आजारी होतो, तेव्हा जे 6 नगरसेवक चोरलेना यांनी आणि हे खोके खोके बोलतात, यांनी तेव्हा किती खोके दिले, हे मलाही माहीत आहे. कारण जे सातवे संजय तुर्डे गेले नाहीत, त्यांनाही तो फोन आलेला होता. त्यामुळे ते जे आजारपण असताना तुम्ही म्हणता 40 आमदार फोडले, तर मी पण आजारी होतो आणि मी कशा प्रकारे गेलोय हे मला माहीत आहे, तेव्हा जे 6 नगरसेवक फोडले, तेव्हा साहेबांची परिस्थिती काय असेल? तो विचार कधीच झाला नाही आणि तो कधीच होत नाही. तेव्हा जे माझ्या मनात बसलं ना की, हे कसे आहेत. त्यामुळे थोडे दूर राहीलेलेच चांगले." असा टोला अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले, तेव्हा आम्ही पत्रकार म्हणायतो की नॅचरली शिवसेनेचे केडर राज ठाकरे हायजॅक करतील, पण तसे झाले नाही? यावर अमित ठाकरे म्हणाले, "झाले नाही, असे नाही, केले नाही." यानंतर, अत्ताही 2022 मध्ये शिंदेंचे जे बंड झाले, शिवसेना बऱ्यापैकी स्वतःकडे नेली, तेव्हाही जे केडर होतं त्याला राज ठाकरेंनी हात घातला नाही. राज ठाकरे काही नैतिक बंधनं पाळतात या बाबतीत? यावर अमित म्हणाले, "शंभर टक्के...! म्हणून मी बोललो की, मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर, राजकारणात आलो नसतो. कारण मला माहीत आहे की, माणूस किती साफ आहे? वडील म्हणून नाही बोलत मी. काय प्रकारचा माणूस आहे आणि त्याच्याकडून किती घेण्यासारखे आहे?"
यावेळी, "मी आदित्यबरोबर फार लहानपणी खेळायचो, बोलायचे तेव्हा तिकडे असायचो. पण तेव्हा ते होतं. मात्र साहेब एका कुठल्या मुलाखतीत बोलले होते की, नजर लागली, तसं आपण समजू..., असेही अमित म्हणाले.