नागपूर : साधारणपणे अध्यक्ष सदस्यांना संयमाने वागण्याचा सल्ला देतात. वेळप्रसंगी ताकीदही देतात. परंतु बुधवारी विधानसभेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून थोडे अधिक संयमाने वागण्याची विनंतीपर अपेक्षा व्यक्त केली.
कॉँग्रेसतर्फे नागरिकत्व सुधारणा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली. यावर जोरदार वाद सुरु असतानाच सुधीर मुनगंटीवार बोलण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु त्यांना संधी मिळत नव्हती. यावर अध्यक्ष नाना पटोलेंनी तुमच्यापैकी कोण बोलेल ते सांगा? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी मुनगंटीवार ३३ हजार मतांनी निवडून आले आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.
पॉर्इंट आॅफ आॅर्डर कुणीही सदस्य घेऊ शकतो, त्यावर बंदी घालता येत नाही, असेही ते म्हणाले. फडणवीस म्हणाले, ‘अध्यक्ष महोदय आपण ज्येष्ठ आहात. अध्यक्षांनी थोडा जास्त संयम ठेवावा. आपण संयमी आहातच, पण अध्यक्षांनी जरा जास्त संयम दाखवायचा असतो. मी पण जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा माझाही स्वभाव असाच होता, मी अंगावर धावून जायचो. मग मी स्वत:ला समजावलं, मी मुख्यमंत्री आहे, हे आपलं काम नाही. आपण संयमाने वागलं पाहिजे, मग मी संयमाने वागायला लागलो. तसं आपणही आक्रमक आहात. पण आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर एवढी आक्रमकता योग्य नसते. संयमाने आपण वागावं अशी हात जोडून विनंती आहे,’ असे फडणवीस पटोले यांना म्हणाले.