- आप्पासाहेब पाटील / ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 27 - शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, या आहाराचा उपयोग गुरांना चारा म्हणून दिला जातो याशिवाय अन्य आरोप होत असताना मी गप्प बसणे योग्य नाही, त्यासाठी मी बदलणं गरजेचे आहे ना.. शालेय पोषण आहाराचे टेंडर तर मागच्या सरकारने काढलेले आहे़ त्यात बदल करणे काळाची गरज असून त्यानुसार मी शालेय पोषण आहाराच्या रेसिपीत बदल केला आहे़ त्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी ठेवला आहे़ सही झाली की नवीन रेसिपी लगेच जाहीर करून मुलांना सकस आहार पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. हिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी १०० मुद्दे तयार करण्यात आल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले़
पुढे बोलताना ग्रामविकासमंत्री मुंढे म्हणाल्या की, शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सहा महिने ते दोन वर्षाची जी मुले आहेत, त्या मुलांना शिशू आहार दिला पाहिजे. आता सध्याच्या घडीला या मुलांना आपण पाच वर्षाच्या मुलांना जो देतो तोच आहार देतो ते चुकीचे आहे. कारण उकडलेले अंडे हे सहा महिन्याचे बाळ नाही खाऊ शकत. त्यामुळे सहा महिने ते दोन वर्षाच्या मुलांना सेरेलॅक सारखा शिशूचा आहार देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नव्या प्रस्तावात शालेय पोषण आहारात गटनिहाय रेसिपी वेगळ्या केल्या आहेत. दोन ते सहा या वयोगटातील मुलांच्या रेसिपीतही बदल केला. शिवाय किशोरवयीन मुली व गर्भधारणा केलेल्या मातांच्याही आहारात बदल केला़ याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे तो लवकरच सही होऊन पुढे येईल असेही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले़
आरोप तर होणारच
कोणतेही नवीन निर्णय घेताना आरोप होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण कॉन्ट्रक्टरची एक तालुकास्तरावर मोठी फळी आहे. तालुकास्तरावर हा आरोप केला जातो की हा पोषण आहार गुरांना खाऊ घातला जातो. या होणाºया आरोपामुळे मी बदलले पाहिजे ना कारण टेंडर तर मी काढलेले नाही. पुर्वीच्या सरकारने टेंडर काढले़ जर पोषण आहार गुरांना खाऊ घालत असतील तर मी बदलणं महत्वाचे आहे. त्यामुळे मी पोषण आहारात बदल केले आहेत़ तरीही माझ्यावर काही आरोप झाले तरी माझा मला लोकांना रोजगार देण्यासाठी हा आहार बनवायचा नाही तर हा आहार सकस बनविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे़