सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील 'छावा' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमाने छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले बलिदान अगदी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. चित्रपट पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी येत आहे. त्यांचे बलिदान तरूण पिढीला प्रेणार देणारे आहे. सत्ता धाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वचजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मात्र, यातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. "औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. जीडीपी २४ टक्के होता. हे सर्व मी चुकीचे म्हणू का?" असा सवाल करत, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई सत्तेसाठी होती. धर्मासाठी नव्हती," असेही अबू आझमी यांनी म्हटले होते. यानंतर, आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते," असे म्हटले आहे.
काय म्हणाले रोहित पवार -सोशील मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, "ज्याने स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकाचा रक्तपात केला, त्या क्रूरकर्म्या औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. याच औरंगजेबाने आपला महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून खून केला, त्यांच्या अंगावरील भळभळणाऱ्या त्या जखमा आणि वेदनांनी संपूर्ण देशासह तमाम महाराष्ट्र आजही विव्हळत आहे. त्यामुळं औरंगजेब कुणासाठी पूजनीय असला तरी आमच्यासाठी मात्र तो स्वराज्याचा, महाराष्ट्राचा, देशाचा आणि मराठी माणसाचा कायम नंबर एकचा शत्रू राहील. इतिहासाचं पुस्तक न चाळता औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांचं मस्तक तपासण्याची गरज आहे."
नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?"औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमारपर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होतं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का?" असा सवाल करत, "छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती, असे कुणी म्हणत असेल तर ते मी मानत नाही," असेही अबू आझमी यांनी म्हटले होते.