"मला मनापासून वाटतं, मुख्यमंत्री व्हावं", अजित पवारांनी व्यक्त केली इच्छा; शिंदेंची धाकधूक वाढली?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 05:03 PM2023-07-05T17:03:56+5:302023-07-05T17:14:35+5:30
Ajit Pawar : अजित पवार यांनी आगामी काळातील मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा स्पष्टपणे सांगितला आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यंत्री अजित पवार आमनेसामने आले आहेत. आज मुंबईत शरद पवार आणि अजित पवार गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत बोलताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार यांचे हे आक्रमक पक्षविस्ताराचे धोरण आणि मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा ही शिंदे गटाच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीने धोकादायक ठरु शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. मी चार-पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो. पण गाडी तिथेच थांबते, पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटतं, मुख्यमंत्री व्हावं. मनात अनेक गोष्टी आहेत. त्या राबवायच्या असतील तर राज्याचं प्रमुखपद मिळवणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, असे विधान करुन अजित पवार यांनी आगामी काळातील मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा स्पष्टपणे सांगितला आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. शिंदे गटाचे आमदार पुढील पाच वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असे सांगत आहेत. मात्र, अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा पाहता आगामी काळात ही परिस्थिती कितपत राहील, याबाबत आत्ताच शंका निर्माण झाली आहे.
याचबरोबर, अजित पवार यांनी आज अत्यंत प्रभावी भाषण करत आपण शरद पवार यांच्याविरोधात भूमिका का घेतली, हे जीव ओतून सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारून पक्षाची धुरा आपल्या हाती द्यावी, अशी स्पष्ट मागणी केली. अजित पवार म्हणाले की, २ मे ला शरद पवार म्हणाले मी राजीनामा देतो. राजीनामा दिल्यानंतर एक कमिटी करतो, म्हणाले. त्यातच सर्व बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा म्हणाले. त्यालाही आम्ही होकार दिला. त्यानंतर दोन दिवसांनी सांगितले राजीनामा मागे घेतो. मागेच घ्यायचा होता तर राजीनामा दिला का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह आपल्याकडे ठेवायचे असल्याचेही ठामपणे सांगितले. आपल्या पक्षाला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आपली राष्ट्रीय मान्यता रद्द झाली आहे. ही राष्ट्रीय पक्षाची मान्यता पुन्हा मिळवायची आहे. आजपर्यंत तुमच्या मदतीने आपण इथवर आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २००४ मध्ये ७१ इतक्या सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ कुठल्याही परिस्थितीत आपण ७१ च्या पुढे नेऊ. त्यासाठी मराठवाडा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी लागल्यागत फिरू, असे अजित पवार म्हणाले.
याशिवाय, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणूक एकत्र लढवल्यास आपल्याला विधानसभेच्या सध्याच्या ५४ जागा मिळणारच आहेत. त्यापेक्षा जास्तीच्या जागा आपल्याला काँग्रेसच्या मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या ९० जागा लढवेल, तसेच लोकसभेच्या काही जागाही आपण लढवणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, अजित पवार यांच्या या दाव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वाट्याला सर्वाधिक आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ९० जागा आल्यास शिंदे गट आणि इतर घटकपक्षांसाठी किती जागा सोडल्या जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी ही भविष्यातील धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.