मुंबई - बाळासाहेब ठाकरेंचे हिंदू माणसांवरील ऋण कुणीही फेडू शकत नाही. बाबरी पाडताना संजय राऊत कुठेही नव्हते. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान मी कधीही करू शकत नाही. बाबरी पाडताना जे होते ते हिंदू होते, शिवसैनिक म्हणून कुणी नव्हते. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष झाला. भाजपाही विहिंपच्या नेतृत्वात होती. प्रत्येकजण हिंदू म्हणून त्या आंदोलनात होता असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा
चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझा ठराविक प्रश्न शिवसेना कुठे होती असा नव्हता तर संजय राऊत कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या अनादराचे पाप मी करणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे केवळ उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही. ते आमच्या सगळ्यांचेही आहेत. माझा पक्ष माझ्यासोबत आहे. ते टीव्हीवर दाखवण्याची गरज नाही. माझ्या विधानाची क्लीप मी सगळ्यांना दाखवणार आहे. त्यात कुणाचा अपमान झालाय हे सांगावे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मनात श्रद्धा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्यांनी बाळासाहेबांबद्दल कुठेही अनादर केला नाही, पण वादाबाबत स्पष्टीकरण द्या म्हटलं. जयंत पाटील काय म्हणतात त्याची मला काळजी करण्याचं कारण नाही. उद्धव ठाकरेंना फोन करून तुम्ही माझ्याबद्दल असं काय म्हणता हेदेखील बोलू शकतो इतके संबंध आहेत. बाळासाहेबांबद्दल मी कधी असे बोलेन का? हेदेखील मी उद्धव ठाकरेंशी बोलेन असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, मी साधा सरळ माणूस, ग्रामीण भागातून वर आलेलो आहे. बाळासाहेबांच्याबद्दल आमच्या मनातील श्रद्धा आहे. अयोध्येच्या संघर्षात शिवसेनेचा मोठा सहभाग होता असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यात मी म्हटलं माझे दुमत कुठे? स्व. आनंद दिघेंनी सोन्याची वीट मंदिर बांधकामासाठी दिली होती. माझे मत आहे की या आंदोलनात कुणी भाजपा, शिवसेना किंवा अन्य पक्षाचे नव्हते तर सर्व हिंदू म्हणून एकत्र होते. त्या हिंदूंचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करत होती. त्यात बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करण्याचा संदर्भ नाही असंही स्पष्टीकरण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.