मुंबई-
तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता या वादात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. हिंदी भाषेवरुन संजय राऊत यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाच आव्हान दिलं आहे. एक देश, एक संविधान आणि एक भाषा हे सूत्र लागू करण्याचं आव्हान आता अमित शाह यांनी स्विकारलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
'...हे तर नशेबाज लोक क्षुद्र किटक, उडून जातील', संजय राऊतांचं केतकी चितळेच्या पोस्टवर भाष्य!
तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान करत हिंदी भाषा ही पाणीपुरीवाल्यांची भाषा आहे, असं म्हटलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं. "मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझं म्हणणं ऐकावं. हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा. एक देश, एक संविधान आणि एक भाषा याचं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारलं पाहिजे", असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी तामिळनाडूच्या शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. हिंदी ही देशात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे हिंदीचा सर्वांनीच आदर केला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
आजच्या सभेत सर्वांवर उपचार!शिवसेनेच्या आजच्या जाहीर सभेबाबत बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "काही लोक राज्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. ही जी पोटदुखी आणि जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत उपचार केले जातील. बुस्टर डोस कुणाचा ते माहित नाही. पण आमचा मास्टर ब्लास्टर डोस असेल एवढं नक्की", असं संजय राऊत म्हणाले.
"महाराष्ट्रातील, देशातील वातावरणावर आलेलं मळभ, धुकं आणि गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेनं दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचं धनुष्य दिसेल. राज्य आणि शिवसेना पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. काही लोक राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. ही पोटदुखी आहे, जळजळ आहे त्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील. बुस्टर डोस कुणाचा ते माहित नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर ब्लास्टर डोस असतो", असं संजय राऊत म्हणाले