औरंगाबाद : ‘लोकसंग्रह हा वारकरी परंपरेचा स्थायीभाव आहे. लोकांचा कौल आजमावून अध्यक्षपदी निवडून येण्याची पारदर्शक प्रक्रिया मला भावते.’ अशी भूमिका संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडली. पंजाब प्रांतातील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी यांचे नाव सुचवणारा अर्ज सोमवारी मराठवाडा साहित्य परिषदेतून दाखल झाला. याआधी त्यांचा अर्ज १५ सप्टेंबरला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आला आहे. या अर्जावर सूचक म्हणून प्रा. जयदेव डोळे यांनी सही केली. यासह श्रीकांत उमरीकर, प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, श्याम देशपांडे, प्रमोद माने व जीवन कुलकर्णी हे अनुमोदक आहेत. अध्यक्षपदासाठी मोरे यांच्यासह संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत व कथाकार भारत सासणे रिंगणात आहेत.निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेचाच एक भाग असून, सार्वजनिक वृत्तीचा मनुष्य म्हणून ती वर्ज्य नसल्याचे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. अर्ज दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत डॉ़ मोरे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेतही काही सुधारणा होणे गरजेचे असून, अध्यक्षपद सन्मानाने मिळाले तर ते अधिक चांगले़ संत नामदेवांचा प्रवास हा मराठवाड्यातील त्यांचे जन्मगाव नरसी ते पंजाबमधील घुमान असा झाला आहे. संतजनांनी मराठीला महाराष्ट्राबाहेर नेण्याचे अभिमानास्पद कार्य केले. अशावेळी घुमानमधील संमेलनाचा अध्यक्ष संतपरंपरेतील असणे औचित्यपूर्ण ठरते. मात्र तुकारामांच्या वंशात जन्मलेला मी परंपरेचा केवळ चालक नसून डोळस अभ्यासक आहे.’ संतसाहित्य हा मराठी साहित्य प्रकारातील मुख्य प्रवाह आहे. सध्या काहीसा मागे पडला असून, तो पुन्हा वाहता व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मोरे म्हणाले.
‘निवडणूक प्रक्रियेचा मी सन्मान करतो’
By admin | Published: September 23, 2014 4:56 AM