NCP Ajit Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. रामराजे यांच्या मर्जीतील फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्यासह रामराजेंचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे रामराजेंचाही एक पाय पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचं बोललं जातं. अशातच आज अजित पवार यांनी रामराजेंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
"रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणसह सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात का दिसत नाहीत?" असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, "रामराजे प्रचारात दिसत नसतील तर मी त्यांना नोटीस काढतो."
फलटण मतदारसंघाचं राजकीय गणित
फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची असणार आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली ३५ वर्षे एकहाती रामराजे यांची सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले त्या त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकत दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक जिंकून माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजेगटाला आव्हान दिले.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सचिन कांबळे पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.