Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप तोडगा निघाला नसून जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाचं वादळ आता राजधानी मुंबईत धडकणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. सरकारकडून सातत्याने शिष्टमंडळ पाठवत जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत समाधान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सरकारने दिलेले वविध प्रस्ताव जरांगे पाटलांकडून धुडकावून लावण्यात आले आहेत. अशातच आज जरांगे पाटील यांनी शासनाच्या शिष्टमंडळावर गंभीर आरोप केले आहेत. "आज सकाळी मी लोणावळ्यात पोहोचल्यानंतर काही सरकारी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात एका कागदावर माझी सही घेतली. हा कागद कोर्टाचा असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. पण माझ्या सहीचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे," असा आक्रमक इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
सकाळी झालेल्या घडामोडींबद्दल बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे की, "सकाळी अधिकारी आला आणि मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत त्याने माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो, त्यामुळे मी लगेच सही केली. त्यामध्ये जे दोन कागद होते, त्यातील एका कागदावर मराठीतून मजकूर होता, तर दुसऱ्या कागदावर इंग्रजी मजकूर होता. मी गडबडीत त्यावर सही केली," असा दावा जरांगेंनी केला आहे.
"आता माघार नाही"
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार आहेत. आझाद मैदानावर एवढी मोठी क्षमता नाही तर बाकीच्या मैदानावर अन्य नियोजित कार्यक्रम आहेत, त्यामुळे मुंबईत या मोर्चाला परवानगी दिलेली नाही, असं मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मात्र काहीही झालं तरी आम्ही मुंबईला जाणारच, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.