विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेब देसाई यांच्या 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी केलेल्या भाषणादरम्यान आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्याबाबत संकेत दिले. यासोबत आपण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. परंतु आता निर्णय घेणार नसून गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेणार असल्याचेही संकेतही त्यांनी यावेळी दिले.
"देसाई यांनी १९७७ ते ७८ दरम्यान विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. ७७ साली माझा जन्म झाला आणि त्यावेळी बाळासाहेब देसाई यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ज्या प्रकारे त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात क्रांतिकारी निर्णय घेतले, त्यातूनच शिकून कदाचित मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन," असं नार्वेकर म्हणाले.
"आपल्या १४ व्या विधानसभेत अनेकांनी काम केलं, त्यापैकी एक बाळासाहेब देसाई यांनी त्यांचं कार्य कायम केलं. ईबीसी, शिक्षण विभागातही त्यांनी खूप काम केलंय. ईबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला," असंही त्यांनी नमूद केलं. "बाळासाहेब देसाईंच्या सामाजिक कार्याचा वारसा शंभूराज देसाई पुढे नेत आहेत, बाळासाहेब देसाईंनी आपल्या कार्यानं साम्राज्य उभं केलं, त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मला बोलावण्यात आलं हे माझे भाग्य आहे,'' असंही नार्वेकर म्हणाले.