"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:25 PM2024-09-25T18:25:36+5:302024-09-25T18:26:22+5:30

Maharashtra Assembly Election 2024: राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवार यांची गाडी नेहमी उपमुख्यमंत्रिपदावरच येऊन अडकते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करत मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या मार्गातील नेमकी अडचण सांगितली आहे.

"I want to be the Chief Minister, but..." Ajit Pawar said the exact problem   | "मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पाच वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवार यांची गाडी नेहमी उपमुख्यमंत्रिपदावरच येऊन अडकते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करत मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या मार्गातील नेमकी अडचण सांगितली आहे.

आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडलं. यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण आमची गाडी तिथेच अडकते. त्याला काय करणार. पुढे जाता यावं यासाठी मी प्रयत्न करतो. मात्र संधी मिळत नाही. एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला संधी चालून आली होती २००४ मध्ये. मात्र पक्षाच्या नेतृत्वाने ती गमावली. जो कुणी खुर्चीवर बसतो त्याला ती चांगली वाटते. त्याच हिशोबाने प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची एकच जागा आहे. जो १४५ आमदाराचं समर्थन मिळवेल तो मुख्यमंत्री बनेल. माझी महत्त्वाकांक्षा काय आहे हे मी आता सांगणार नाही. सध्यातरी आमचं लक्ष्य महायुतीच्या रूपात पुन्हा सत्तेत येणं हेच आहे.

दरम्यान, महायुतीमध्ये येताना घडलेल्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी सांगितलं की, याबाबत मी दिल्लीशी चर्चा केली होती. जे. पी. नड्डा, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशीही सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत चर्चा केली. अन्य कुणासोबतही कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे बाकीचे लोक काय म्हणताहेत, त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. 

Web Title: "I want to be the Chief Minister, but..." Ajit Pawar said the exact problem  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.