- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मी युती केली, कारण मला तुमच्यातला गिरीश महाजन नावाचा एक माणूस हवाय, तो मला माझ्या मतदारसंघात द्या, कारण आम्हालाही निवडणुका जिंकायच्या आहेत, अशी गुगली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकली खरी, पण त्यामुळे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांची दांडी उडाल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर विधानभवनात रंगली.
युतीच्या निर्णयानंतर खूश झालेल्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी भाजपा, शिवसेनेच्या आमदारांसाठी सोमवारी रात्री स्नेहभोजन ठेवले होते. स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरेही हजर होते. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘मी युती करण्यासाठी का तयार झालो, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्याचे खरे कारण मी अजूनही कोणाला सांगितलेले नाही. पण आज सांगतो, मला तुमच्यातला एक माणूस हवाय. गिरीश महाजन. तो आमच्या मतदारसंघात हवा आहे. कारण आम्हालाही निवडणुका जिंकायच्या आहेत बाबा... बारामतीसह महाराष्टÑ जिंकायचा तर तुमची मदत लागेलच,’ असेही उद्धव या वेळी म्हणाले. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास जोरदार हसून दाद दिली. पण शिवसेनेचे जळगावचे नेते गुलाबराव पाटील चिंतेत पडल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
एकनाथ खडसे हे त्या स्नेहभोजनाला हजर नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीश महाजनांच्या प्रेमात आहेतच, आता आमचे साहेबही त्यांच्या प्रेमात का पडले कोणास ठाउक, अशी चर्चा मंगळवारी या निमित्ताने विधानभवनात रंगलेली पाहायला मिळाली. तर भाजपामधील काही ‘महाजनप्रेमींनी’ बरे होईल, घेऊन टाका एकदाचे त्यांना तुमच्याकडे, असे सल्लेही शिवसेना नेत्यांना दिले. या सगळ्यावर खडसे यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.तुम्ही भांडणे लावू नका - रामदास कदमविधानभवनात पत्रकार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे गप्पा मारत उभे होते. तेवढ्यात पर्यावरणमंत्री रामदास कदम तेथे आले. गप्पांच्या ओघात सर्जिकल स्ट्राइकचा विषय निघाला तेव्हा तावडे लगेच म्हणाले, शिवसेनेच्या मागण्यांमध्ये हीदेखील एक मागणी होतीच की. तर आता जमले का तुमचे असे काहींनी विचारले असता रामदास कदम म्हणाले, ‘तुम्ही आता आमच्यात भांडणे लावू नका... आमचे बरे चाललेय. फार तर जेवायला या आमच्याकडे...’ त्यांनी असे सांगताच उपस्थितांत हशा पिकला.