विधान परिषदेचा अर्ज भरायच्या १० मिनिटे आधी फोन आला अन्...; पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:26 PM2023-07-07T14:26:22+5:302023-07-07T14:27:00+5:30
प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. त्यानंतर त्या पदावर पंकजा मुंडे दिसत नाहीत अशा चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
मुंबई – मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मला पक्षाकडून फॉर्म भरण्याचे आदेश आले. सकाळी ९ वाजता फॉर्म भरायला या असं म्हटलं. पण त्याआधी १० मिनिटे मला फोन आला आणि सांगितले, तुम्ही फॉर्म भरू नका. मी म्हटलं जैसे आपकी आज्ञा असं म्हणत मी पक्षाचा आदेश कायम शिरसावंध्य मानला. मी पक्षाविरोधात काय केले ज्याने माझ्या नैतिकतेवर प्रश्न उभे केले जातात अशी नाराजी व्यक्त करत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत गौप्यस्फोट केला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी काँग्रेसमध्ये जाणार अशी बातमी पसरवली जाते. हे मुहुर्त असे का काढले जातात. मी राजकारण करेन किंवा नाही करेन. पण मी राजकारण करत असताना मला काही करायचे ते डंके की चोट पर करेन. लोकांचे प्रश्न ऐकून माझा राजकारणात येण्याचे मूळ काय याने मनात गोंधळ होतो. पक्ष हा सर्वश्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ सत्ता असं होऊ नये. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता व्यक्त होऊ शकत नाही. १०६ आमदार जे कष्ट करून निवडून आले. त्यांच्याही मनात खूप काही असेल तर बोलण्याची, मांडण्याची ताकद त्यांच्यात नाही असंही त्यांनी म्हटलं.
पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण...
तसेच प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. त्यानंतर त्या पदावर पंकजा मुंडे दिसत नाहीत अशा चर्चा होतात. हा दोष माझा नाही. यावर पक्षाने उत्तर द्यायला पाहिजे. पंकजा मुंडे पात्र असतील, नसतील याचे उत्तर मी कितीवेळा देणार. मी त्याची उत्तरे देऊ शकत नाही. भागवत कराड यांना राज्यसभा दिली, रमेश कराडांना विधान परिषद दिली. जेव्हा जेव्हा माझे नाव पुढे आले. मला काही मिळाले नाही. याबाबत मी कुठेही टिप्पणी केली नाही. ट्विट केले नाही. सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली नाही. परंतु त्याआधी किंवा नंतर होणाऱ्या माझ्या भाषणाचे तुकडे काढून फिरवले जातात. काही ठिकाणी हे अर्थ समर्पक बसतात. पंकजा मुंडे का नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही असंही पंकजा मुंडेंनी सांगितले.
दरम्यान, अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. मी मुद्द्यांवर बोलते. पंतप्रधान मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायरीवर डोके ठेवले. हे जगाने पाहिले. स्वच्छ चारित्र्यसंपन्न राजकारणी म्हणून तरूणांनी त्यांच्याकडे पाहिले. त्या नेत्याकडे पाहून अनेक प्रशासकीय लोक राजकारणात आले. अशीच तरूण पिढी या नेत्यानी घडवावी. राजकारणात भ्रष्टाचारमुक्त नारा मोदींनी दिला. माझ्यासारखा तरूण प्रभावित झाला. मी ईश्वरसाक्ष कथन करते की, मी कुठल्याही पक्षात, कोणत्याही नेत्यांशी माझ्या पक्षप्रवेशासाठी बोलले नाही. मी राहुल गांधी आणि सोनिया गांधी कधी प्रत्यक्षात पाहिले नाही. सोनिया गांधी आणि मी एका शहरात आहे असंही कधी झाले नाही. ज्यादिवशी माझ्याबाबत काँग्रेस प्रवेशाची बातमी येते तेव्हा मी मध्य प्रदेशात पक्षाचे काम करत होते. माझ्या आयुष्यात स्पष्टवक्तेपणाला, प्रामाणिकपणाला आणि न्यायप्रिय भूमिकेला महत्त्व आहे. या भूमिकांशी प्रतारणा होताना मी अस्वस्थ होते. नाराज नाही पण मी दुखी आहे अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.