खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:18 PM2024-05-30T15:18:51+5:302024-05-30T15:38:25+5:30
नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला होता. त्यासोबत काही पदाधिकारीही होते. मात्र त्यातीलच एक पदाधिकारी आज शरद पवार गटात पुन्हा परतला आहे.
ठाणे - काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यात शरद पवारांच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत NCP विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस किरण शिखरे यांचाही अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. मात्र आता या पक्षप्रवेशावरून राष्ट्रवादीत हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. माझ्यावर दबाव टाकून माझा पक्षात प्रवेश करून घेतला असा दावा किरण शिखरे यांनी केला आहे.
ठाणे येथे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत उपस्थित किरण शिखरे यांनी म्हटलं की, मला जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून कोकण विभाग अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस जबाबदारी देण्यात आली होती. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत निष्ठेने राहावं असं मला वाटत होतं. त्यासाठी मी जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्याकडे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. मी स्वत: त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र मी ओबेरॉय हॉटेलला भेटायला गेल्यावर मला तिथे पक्षप्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. तेव्हा मी जिथे आहे तिथे निष्ठेने राहीन, माझ्यावर दबाव टाकू नका असं मी म्हटलं. पण त्या गोष्टी न ऐकता पक्षप्रवेशासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी कुठेही गेलो नाही. मी २४ तासांत पुन्हा माझ्या साहेबांकडे आलो आहे. मला अतिशय टॉर्चर केले गेले असा आरोप शिखरेंनी लावला.
तसेच मी कालपासून मी घरी गेलो नाही. घरापर्यंत माणसं पाठवली जातायेत. मला आव्हाडांकडून जो चुकून प्रकार घडला त्याचा निषेध करायला सांगितले. तू एससीचा आहे असं म्हटलं गेले. पण मी छातीठोकपणे सांगतो, माझ्याकडे जातीने पाहिले नाही. मला पक्षप्रवेश करण्यासाठी तुला विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनवतो. जे हवं ते देतो असं सांगितले. परंतु मी कुठल्याही पदासाठी प्रलोभनासाठी गेलो नाही. वेळोवेळी आम्ही शरद पवारांच्या माध्यमातून काम केले. सुप्रिया सुळेंवर आज ते टिका करतायेत. पण एप्रिल महिन्यापासून सोनिया दुहन यांनी प्रचार बंद केला होता. भाजपाविरोधात कुठलेही ट्विट टाकलं नव्हते असंही किरण शिखरे यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांनी या लोकांना भरभरून दिले. त्यांना सन्मान राखला गेला पण हे लोक सोडून दिले. परंतु मी माझ्या पक्षाशी, शरद पवारांशी प्रामाणिक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. मी जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात काम करून इथपर्यंत आलो आहे. मरेपर्यंत मी जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांसाठी काम करत राहणार आहे. मी माझ्या घरी जाऊ शकत नाही इतका माझ्यावर दबाव आहे. आज मी हे बोलल्यानंतर कुठल्या गुन्ह्यात मला लटकवलं जाईल हे माहिती नाही. परंतु मला मारून टाकलं तरी पक्ष सोडणार नाही. मी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहे. जे काही प्रकार घडले ते दबावातून घडले. मी मुंबईतून कल्याणला पळून आलो, त्यानंतर आज ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना भेटायला आलोय असा दावाही किरण शिखरे यांनी केला.