अजित पवार, फडणवीस यांची भाषणे झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले. त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारमध्ये शिवसेनेची कशी कोण गळचेपी करत होते, यावर एवढी टोलेबाजी केली की फडणवीसांसह भाजपा-शिवसेनेचे आमदार पोट धरून हसत होते, तर समोरील बाकावरील पवार, जयंत पाटील यांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते.
यावेळी शिंदेंनी भाजपा, शिवसेनेच्या आमदारांचा मी मुख्यमंत्री नाहीय, तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मुख्यमंत्री आहे. एवढेच नाही तर अजितदादा देखील आमचेच आहेत. मी माड्या बांधल्या नाही, हॉटेल बांधली नाहीत. आहेत का हो आव्हाड साहेब, अशा शब्दांच शिंदे यांनी राष्ट्रवादीला कोपरखळी मारली. मी नगरविकास मंत्री होतो, तेव्हा मी आमदारांना खूप पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होते. कारण काही जण वॉच ठेवून होते, भाजपाच्या आमदाराला जास्त पैसे तर देत नाहीय ना, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाला लगावला.
मोदींनी मला सांगितले, एकनाथजी चांगले काम करा, राज्याला प्रगतीपथावर न्या. नड्डांचे देखील आभार मानतो. त्याहून मोठा कलाकार माझ्या शेजारी बसलाय. आम्ही कधी भेटायचो हे कोणाला कळायचे पण नाही. रात्री आमचे लोक झोपले की मी त्यांना भेटायचो आणि सकाळी जागे व्हायच्या आधी परत यायचो, असे शिंदे म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी डोक्यावर हात मारून घेतला.
अजित पवार आणि जयंत पवारांवर बोलताना शिंदे यांनी म्हणाले की दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते. जयंत पाटील तर आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच. यामुळे आमचे आमदार चलबिचल झाले. ते मला येऊन भेटायचे. मी मोकळाच होतो, यामुळे मी त्यांचे ऐकून घ्यायचो. चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून बाहेरच होते. जिल्ह्यात जात नव्हते. एका पदाधिकाऱ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या घरच्यांकडे गेले, त्याला राष्ट्रवादीत ये एक सुनावणी लावू आणि सगळे गुन्हे रद्द करू, हे जयंत पाटांलाना माहितीय असे मी म्हणत नाही, असेही शिंदे म्हणाले.
आता बोललो तेवढे पुरे झाले, उरलेले आपण नंतर एकत्र बसून बोलू, हे सरकार बहुमताचे सरकार आहे. मंत्री झालो तरी कार्यकर्ताच राहणार. त्यामुळे विरोधकांनी देखील दुजाभाव करू नये. मोदींच्या मदतीने आपण राज्याचा विकास करू, असे शिंदे म्हणाले.