मुंबई - राज्याच्या विधानसभेत आज बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. "शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचंही ते म्हणाले.
"स्वत:चं मंत्रीपद दावावर लावून मी 50 आमदारांना घेऊन, समोर बसलेल्या बलाढ्य सरकारविरोधात बंड पुकारले. समोर सत्ता, यंत्रणा, एवढी मोठी माणसं होती. दुसरीकडे बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या 50 लोकांचा. आपण हे मिशन सुरू केलं तेव्हा कोणी विचारलं नाही. कुठे चाललोय, कधी चाललोय, किती वेळ लागणार कोणी विचारलं नाही. सुनील प्रभू यांना माहिती आहे माझं कशाप्रकारे खच्चीकरण झालं. शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल. पण मागे हटणार नाही" असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
"मी मतदानाच्या दिवशी निघून आलो तेव्हा डिस्टर्ब होतो. मला बाळासाहेबांनी सांगितलेलं आठवलं की अन्यायाविरोधात बंड पुकारलं पाहिजे. आम्हाला अनेक फोन आले. पण मला एकही आमदार आपण मुख्यमंत्र्यांना भेटून पुढे जाऊयात असं म्हणाला नाही. हा विश्वास आहे."
"एका बाजुला महान नेते होते, सरकार होते, यंत्रणा होती आणि दुसरीकडे माझ्यासारखा एक साधा शिवसैनिक होता. पण माझ्या भरोशावर चाळीस आमदारांनी सगळं पणाला लावलं. या सगळ्यांचा मला अभिमान आहे. मी या सगळ्यांना सांगितलंय की पुढं काय व्हायचं ते होवो, तुमचं नुकसान होतंय असं वाटलं तर मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही. तर मी जगाचा निरोप घेऊन निघून जाईन" असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
अपघातात गमावलेल्या दोन मुलांच्या आठवणीनं एकनाथ शिंदे भावूक झाले. "शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं. माझी दोन मुलं मी गमावली तेव्हा खचून गेलो होतो. आनंद दिघेंनी मला पुन्हा उभं केलं. मी खूप मेहनत केली. दिघेंमुळे पुन्हा शिवसेनेसाठी सारंकाही झुगारुन काम करू लागलो. शिवसेनेला कुटुंब मानलं आणि आज माझा बाप काढला जातोय" असं शिंदे यांनी म्हटलं आहे.