नाशिक : शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राज्यात त्यांचे समर्थन करणारा मी पहिलाच होतो. माझ्याच विरोधी पक्षनेतेपदाच्या बंगल्यात पक्ष स्थापनेची बैठक झाली व चिन्ह, नाव काय असावे यावर चर्चा झाली. नवीन पक्ष स्थापनेच्या वेळी माझ्याच माझगाव मतदारसंघातून एक हजार प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात आली व पहिला प्रांताध्यक्ष देखील मीच झालो. त्यामुळे शरद पवार यांचे माझ्यावर अधिक प्रेम असल्यानेच त्यांनी माझ्या येवला मतदारसंघात पहिलीच सभा घेतली, असा उपरोधिक टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांचे नाशकात आगमन झाले. भुजबळ फॉर्म येथे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, येवला मतदारसंघ सुरक्षित आहे हे पवार यांनी आपल्याला सांगितले हे खरे असले तरी मला विधानसभेसाठी एरंडोल, वैजापूर, जुन्नर या मतदारसंघातून मागणी होती. त्याच वेळी येवल्यातील सरपंच व काही नेत्यांनी मी येवल्यातून लढावे यासाठी मुंबईत मुक्काम ठोकला होता. माझ्यासाठी जुन्नर मतदारसंघ सोपा होता. त्यावेळी जुन्नर की येवला असा प्रश्न निर्माण झाला असता, शरद पवार यांना आपण येवला येथून लढण्यास तयार असल्याचे सांगितले.
मला मुख्यमंत्री करणार होते... छगन भुजबळ
शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आपण त्यांच्या सोबत जाऊ नये म्हणून त्यावेळी काँग्रेसच्या दिल्लीतील जवळपास सर्वच नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला होता व महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच असणार असा शब्द दिला होता. परंतु आपण शरद पवार यांची साथ सोडली नाही असा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला