मुंबई – शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे वादाप्रमाणे राष्ट्रवादीतही शरद पवार-अजित पवार संघर्ष सुरू आहे. शरद पवार गटातील लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे. त्यात अलीकडेच एकनाथ खडसे यांनी आपल्यालाही अजित पवारांमार्फत त्यांच्यासोबत येण्यासाठी ऑफर होती असा दावा केला. परंतु अजित पवारांनी मी खडसेंना फोन केला नाही असं स्पष्टीकरण देण्यात आले. या प्रकरणी आता आमदार अमोल मिटकरींनी खुलासा केला आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, एकनाथ खडसे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी भाजपात काम केले आहे. तितक्याच ताकदीचे अजित पवार नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा कारभार सांभाळला आहे. मी फार नवखा माणूस आहे. जर अजितदादांना सांगायचे असते तर त्यांनी थेट नाथाभाऊंना फोन केला असता. मी ऑफर दिली असं नाथाभाऊंनी म्हणणं हे खरोखर हास्यास्पद आहे असं विधान त्यांनी केले.
त्याचसोबत एकनाथ खडसेंची बातमी पाहून माझ्या बायकोलाही हसू आले, खरोखर तुम्ही ऑफर दिली का असं तिने विचारले. सुनील तटकरे बोललेत हे एकवेळ समजू शकलो असतो. पण मी खूप लहान कार्यकर्ता आहे. २ मोठ्या माणसांमध्ये मी मध्यस्थी करावी इतका मोठा माणूस मी नाही. एकनाथ खडसे जे काही बोलले ते खूप चुकीचे आहे. माझा त्यांच्याशी दूरान्वये संपर्क नाही. जर कधी फोनवर बोललो तर ते दुसऱ्या कामानिमित्त असते. परंतु पक्षप्रवेशाबाबत मी कधीही संपर्क केला नाही. नाथाभाऊंना मी फोन केला नाही. जर त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी मीडियासमोर जाहीर करावे असं आव्हान आमदार अमोल मिटकरींनी एकनाथ खडसेंना केले.
काय होता खडसेंचा दावा?
मला सत्तेत जायचे असते तर कधीच गेलो असतो. गिरीश महाजन यांना कधीच पुढे आणलं नसतं. अनेकदा मला अजितदादांनी अमोल मिटकरींतर्फे विचारणा केली होती. तुम्ही आमच्यासोबत या असं त्यांनी म्हटले होते, पण आम्ही शरद पवार यांच्याकडे एकवेळ आलेलो आहे. मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. मला भाजपमध्येही येण्यासाठी आग्रह करतात. यात बावनकुळेंपासून ते विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांनी आग्रह केले तरीही मी भाजपमध्ये गेलो नाही, मग अजित पवारांकडे मी कसा जाईल, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी केला होता.