अजितदादांना शपथ घेताना पाहून सगळेच उडाले; पण जितेंद्र आव्हाडांनी काय केलं माहित्येय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:31 PM2019-12-11T16:31:25+5:302019-12-11T16:32:46+5:30
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानं राज्यात राजकीय भूकंप झाला होता
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्यानं गेल्या महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मोठ्या खुबीनं परिस्थिती हाताळत डॅमेज कंट्रोल केलं. अजित पवारांनी बंड केल्यानं महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांना जोरदार धक्का बसला. राज्याच्या राजकीय वर्तुळात धक्कादायक घडामोडी सुरू असताना आपण झोपलो होतो, असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी मी घरी झोपलो होतो. अजित पवारांचा शपथविधी पाहिल्यावर पत्नी आणि मुलीनं मला झोपेतून उठवलं. अजितदादांना शपथ घेताना पाहून मी पुन्हा झोपलो. जाऊ दे, आता झालं ते झालं, अशी माझी त्यावेळची प्रतिक्रिया होती, असं आव्हाड यांनी सांगितलं. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात केलेली घोषणाबाजी त्यावेळी घडलेल्या घटनांना मिळालेली प्रतिक्रिया होती, असंदेखील ते म्हणाले.
अजित पवार भाजपासोबत गेले, तरी शरद पवार आणि भाजपा हे समीकरण जुळणार नाही, याची मला खात्री होती. त्यामुळे तेव्हा मी लगेच सक्रीय झालो. ट्विट करुन माझी भूमिका स्पष्ट केली. आता शरद पवार काय करणार, असा प्रश्न त्यावेळी विचारला गेला. शरद पवारांनी लगेच यशवंतराव चव्हाण सेंटर गाठलं. त्यावेळी तिथे अजित पवारांविरोधात झालेली घोषणाबाजी हा कार्यकर्त्यांचा संताप होता. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या, असं आव्हाड म्हणाले.
अजित पवार माघारी परतल्यानंतर दोन-तीनदा त्यांची भेट झाली. मात्र त्यांच्या मनात कोणतीही कटुता नाही. ते अतिशय परिपक्व नेते आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून झालेली घोषणाबाजी परिस्थितीवरील प्रतिक्रिया होती, याची अजित पवारांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणताही किंतु-परंतु नाही, असंदेखील आव्हाड यांनी सांगितलं. अजित पवारांच्या बंडावर खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही, असंदेखील ते म्हणाले.