मोदी सरकारमधील स्पष्टवक्ता नेता, मंत्री म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या नितीन गडकरींनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. अनेकदा त्यांच्या मनात राजकारण सोडण्याचे विचार येत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. परंतू, जेव्हा विचार करतो तेव्हा राजकारण नेमके कशासाठी करायला हवे, हे लक्षात येते असे ते म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्त शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करताना ते बोलत होते. मी गिरीष गांधींना म्हणायचो राजकारण करू नका, मला खूप वेळा वाटते केव्हा सोडायचे केव्हा नाही. राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या आहेत, असे गडकरी म्हणाले.
पर्यावरणाबाबतची माझी सवय जी बदलली ती गिरीष गांधी यांच्यामुळे. आठवीत असल्यापासून त्यांनी वृक्षारोपणाचा विषय मनात भिनवला. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. माझ्या स्वागताला आणि पोहोचवायला सरकारी अधिकारी दिसला नाही की कार्यकर्ता. कोणीच चुकून गुच्छ घेऊन आला तर त्याला मी तुला वेळ नाही का, कशाकरता आला तू, पुन्हा दिसलास तर लक्षात ठेव, अशा शब्दांत सुनावतो. हे मी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून शिकलो, असे गडकरी म्हणाले.
मी आजपर्यंत बॅनर लावला नाही. उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली स्वत:चा मोठा फोटो लावतो असा टोला गडकरींनी राजकारणात बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना लगावला. आता खऱ्या अर्थाने 'राजकारण' या शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आहे की सत्ताकारण? आहे. जुन्या काळात महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने जे कार्य झाले, ते राजकारण होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं. परंतु सध्या १०० टक्के सत्ताकारण आहे, असे गडकरी म्हणाले.
कमिटमेंट केवळ मानवतेशीज्यांचे अंत:करण स्वच्छ आहे, मानवतेशीच ज्यांची कमिटमेंट आहे, अशा लोकांचीच आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले. गिरीश गांधी असेच व्यक्तिमत्त्व आहे. ते समाजातील वेदना जाणणारे आहेत. त्यांचे अंत:करण स्वच्छ आहे. त्यांची कमिटमेंट ही केवळ मानवतेशी आहे, असेही ते म्हणाले.