लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात माझ्यासारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे केला. परंतु मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत छेडले असता, त्याला वेळ झाला असल्याचे सांगत आता आपले विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात दहीहंडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चौकशीला मी, माझे कुटुंब सहकार्य करीत आहे. यात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली. माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार या प्रक्रियेत मला संरक्षण मिळाले असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना छेडले असता, ते म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृतीप्रिय राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षांत खूप बदल झाला आहे. त्यामुळे तरुण पिढी राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असेही स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत जे वक्तव्य केले, त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, त्यांनी बोलणे टाळले. शिवसेनेच्या भूमिकेबाबत नाराज आहात का, असे विचारले असता, तसे काहीही नसल्याचे सांगितले. तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला.