मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. तर केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी जे 16 कलमी योजना जाहीर करण्यात आली आहे ती आम्हाला अपेक्षितचं होती, त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून किसान रेल योजनेची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे केळी उत्पादक आणि फलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीर ठरणार आहे. तर संपूर्ण देशभर आता केळी आणि फळे रेल्वेच्या माध्यमातून वेळेवर पोहचवता येणार असल्याचे खडसे म्हणाले.
त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना सौरपंपाने कृषीपंप जोडणे यासाठी व्यवस्था करणे, अशा अनेक योजनांचा समावेश 16 सुत्रीमध्ये घेण्यात आल्या असल्याने निश्चितचं याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे खडसे म्हणाले. तसेच सर्वसामन्यांना आयकरच्या स्लॅबमध्ये सुट मिळाली असल्याने त्यांनाही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो असे एकनाथ खडसे म्हणाले.