ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - "मी काल माझ्या खासगी कामासाठी अहमदाबादला गेलो होतो पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतलीच नाही", असा खुलासा नारायण राणे यांनी गुरुवारी केला.
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे स्कॉर्पिओ गाडीतून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी एकत्र दाखल झाले असे वृत्त एबीपी माझाने दिले होते. पण नारायण राणे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचे फेटाळून लावले आहे.
टीव्हीवर दाखवण्यात येत असलेल्या दृश्यांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जे फुटेज आहे त्यामध्ये गाडीचा क्रमांक किंवा अमित शहांच्या शेजारी बसल्याचा कुठला फोटो आहे का ? असा सवाल त्यांनी केला. मी दोनवेळा मुख्यमंत्र्यांसोबत विमानातून प्रवास केला पण त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी माझ्या रुग्णालयाच्या कामासंदर्भात अहमदाबादला गेलो होतो असे नारायण राणे यांनी सांगितले. मी संघर्ष यात्रेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सहभागी झालो. त्यामुळे काँग्रेसमधूनच माझ्या पक्षबदलाच्या चर्चा पसरवण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली पण माझ्या तक्रारीचे निवारण झाले नाही असे नारायण राणे यांनी सांगितले.
भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अहमदाबादमध्ये भेट झाली असून त्यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाली. यामध्ये काही विशेष वाटत नसलं तरी महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेदेखील त्यावेळी अहमदाबादमध्ये उपस्थित होते त्यामुळे नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे पक्षांतर्गत कुरघोडींमुळे नाराज असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त येत आहे. त्यातच योगायोगाने हे तिन्ही नेते एकाच वेळी अहमदाबादमध्ये उपस्थित असल्याने राणेंच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळालं आहे.