'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:22 AM2024-11-16T11:22:33+5:302024-11-16T11:25:31+5:30
Sharad Pawar Ajit Pawar Pratibha Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना अजित पवारांनी प्रतिभा पवाराच्या प्रचाराबद्दल एक विधान केले. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.
Baramati Vidhan Sabha Election 2024: पवार कुटुंबामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा होत आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत असलेल्या या मतदारसंघात आता शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही प्रचारात उतरल्या आहेत. त्यावरून अजित पवारांनी एक विधान केले. त्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी भूमिका मांडली.
'तुम्ही मला १९९१ पासून आमदार केलं. खासदार केलं. तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या का? आताच... काय नातवाचा पुळका आलाय, मला तर काही कळत नाही. काकींना निवडणूक झाल्यावर विचारणार आहे की, काय एवढा पुळका आला त्या नातवाचा तुम्हाला?', असं विधान अजित पवारांनी बारामती मतदारसंघातील पानसरे वाडी येथे केले.
प्रतिभा पवार युगेंद्र पवारांच्या प्रचारात, शरद पवार म्हणाले...
या विधानाबद्दल शरद पवारांना विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "अनेकदा आल्या. याआधीही आल्या. माझ्या प्रचाराचं त्या फारसं कधी बघायच्या नाहीत. बाकी सगळ्यांच्या... माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक."
राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला. ते म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही."
तू म्हण बाबा माझी काही तक्रार नाही -शरद पवार
'अजित पवार वारंवार टीका करताहेत की, शरद पवारांनंतर मीच वाली, असे म्हणताहेत', याकडे शरद पवारांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले, "त्यांना मतं दिली नाही, हेच ना. दुसरं काय? लोकांचा अधिकार आहे तो. त्यांना योग्य वाटलं ते केलं. उद्या कुणी म्हणत असेल, मीच देशाचा प्रमुख. तू म्हण बाबा माझी काही तक्रार नाही. पण, लोकांनी म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग आहे", असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावला.