"राज्यात 'मीच होणार मुख्यमंत्री' स्पर्धा सुरु..."; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:13 PM2024-09-04T18:13:10+5:302024-09-04T18:14:57+5:30
Vijay Wadettiwar: शेतकऱ्याचा आक्रोश करतानाचा व्हिडीओ ट्विट करून मारला टोमणा
Vijay Wadettiwar: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा हाहाकार माजला आहे. पूरगस्त परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना स्थलांतरीत व्हावं लागलं आहे. तसेच पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जितक्या लवकर नुकसान भरपाई रक्कम देता येईल ते पाहावे. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं अशी मागणी राज ठाकरे यांनी महायुती सरकारला केली. याचदरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्याचा आक्रोश करणारा व्हिडीओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
"मीच होणार मुख्यमंत्री'... राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये "मीच होणार मुख्यमंत्री" ही स्पर्धा सुरू आहे. तिघे ही एकमेकांना पछाडण्यासाठी स्पर्धेत धावत आहेत. त्यांना हा रडणारा बळीराजा दिसत नाही,नराधमांनी अत्याचार केलेल्या पिडीत लेकी दिसत नाही, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान दिसत नाही. दिसते ती फक्त मुख्यमंत्री पदाची ‘खुर्ची‘ त्या खुर्चीसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून इव्हेंट करणे सुरू आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे खरीप पीक नष्ट झाले आहे, धाय मोकलून रडत आहेत पण सत्ताधाऱ्यांच्या मनाला पाझर फुटत नाही," असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
'मीच होणार मुख्यमंत्री'
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 4, 2024
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांमध्ये "मीच होणार मुख्यमंत्री" ही स्पर्धा सुरू आहे.
तिघे ही एकमेकांना पछाडण्यासाठी स्पर्धेत धावत आहेत. त्यांना हा रडणारा बळीराजा दिसत नाही,नराधमांनी अत्याचार केलेल्या पिडीत लेकी दिसत… pic.twitter.com/esO44vjiXG
राज ठाकरे शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावे असा सल्ला त्यांनी दिला.