नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीतील सर्वच महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे शहरालगत असलेल्या मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे व भिवंडी चिंचोटी तसेच भिवंडी कल्याण या चारही महामार्गावर सध्या टोलनाके सुरु आहेत. मात्र या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. भिवंडी वाडा महामार्गावर तर अक्षरशः खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरचा टोल नाका सध्या बंद आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा टोल नाका सुरु होणार असल्याचे समजले आहे. रस्त्याची दुरुस्ती न करता हा टोलनाका सुरु केला तर सर्वात आधी मीच हा टोल नाका पेटवून टाकेन असं आव्हान केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडीतील जाहीर कार्यक्रमाप्रसंगी राज्य सरकारला केले.
केंद्रीय राज्य मंत्री पदी कपिल पाटील यांची वर्णी लागल्याने त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सध्या भिवंडी वाडा मनोर रस्त्याची दुरावस्था झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वतः मान्यता दिली आहे, परंतु टोल वसूल करणारी कंपनी राज्य सरकार विरोधात न्यायालयात गेल्याने राज्य सरकारवर आर्थिक भार नको म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यावरील टोल वसुलीस पुन्हा परवानगी देण्याच्या तयारीत आहेत. भिवंडी वाडा हा राज्य महामार्ग राज्य शासनाने केंद्र सरकारकडे हस्तांतरीत केला तर या महामार्गाचे काँक्रेटीकरण करून भाविषयत पस्तीस वर्षांहून अधिक काळ या रस्त्याचा प्रश्न निकाली लागणार आहे. आपण त्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार या मंत्र्यांची भेट देखील घेणार आहोत मात्र राज्य शासनाने हा रस्ता केंद्राकडे हस्तांतर करण्याची सहानुभूती दाखविणे गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे स्थानिक नागरिक येथील आमदार व राज्य सरकारला प्रश्न न विचारता थेट खासदारालाच दोषी ठरवतात हे चुकीचे आहे असं कपिल पाटील म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष भगवान चंदे, समाजकल्याण न्यासचे संस्थापक डॉ सोन्या पाटील, जिपच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव, पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर, माजी सभापती अशोक शेरेकर, बी. बी. पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते.