पुणे - जुन्नर तालुक्यातील एका खासगी कार्यक्रमावेळी आमदार अतुल बेनके हे शरद पवार, अमोल कोल्हे यांच्यासोबत व्यासपीठावर दिसले. या कार्यक्रमात अतुल बेनके यांनी शरद पवारांचे कौतुक केले. शरद पवारांच्या विचाराने आम्ही पुढे वाटचाल करतोय असं विधान त्यांनी केले. त्यामुळे अतुल बेनके हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता आमदार अतुल बेनके यांनी खुलासा केला.
कार्यक्रमानंतर माध्यमांशी बेनकेंनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माध्यमांनी कृपया वेगळा अर्थ-अनर्थ काढू नये. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतोय. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती. मात्र आता ते दोन्ही नेते एकत्र आहेत, निवडणुकीच्या वेळी भाषणे, राजकारण हे वेगळे असते. लोकांनी अमोल कोल्हे यांना निवडून दिलंय. जर कोल्हे खासदार आहेत तर विकासाच्या दृष्टीने आम्हाला एकत्रित तालुक्याचा विकास करावा लागेल. माझ्यावर लोकांचा प्रतिसाद आहे. तालुक्यातील जनता मला निश्चित स्वीकारेल. पक्ष वेगवेगळे असले तरी जनतेच्या हिताच्या दृष्टीने काम करत राहू. एकमेकांशी संवाद ठेवून तालुक्याचा विकास करू असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय शरद पवार हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. गेली ४०-४५ वर्ष आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी कौटुंबिक नाते आहे. राजकारणात कुठलाही निर्णय घेताना अवघड असते. माझे नाते पवार कुटुंबाशी आहे. मी जेव्हा जेव्हा मुंबईत जातो, अलीकडच्या काळात नाही पण मी शरद पवार, अजित पवारांच्या घरी राहिलेलो आहे. मी घरातला माणूस आहे. राजकारणात काहीही स्थित्यंतर झाली असली तरी शरद पवारांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी राहणार आहे. शरद पवारांचे स्वागत हे मी तालुक्याचा आमदार म्हणून केलेले आहे. त्यावर कुठेही पक्षाचे नाव, चिन्ह नाही असंही आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं.
दरम्यान, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ याचा माणूस आहे. पवार कुटुंब म्हणून मी सर्वांशी जवळ आहे. पवार आणि बेनके कुटुंबाचे प्रेम राजकारणामुळे संपणार नाही. राजकारणात मी छोटा माणूस आहे. पवार कुटुंब एकत्र येतील का यावर बोलू शकत नाही. पक्ष फुटला तेव्हा मी तालुक्यात बैठकत घेतली. तेव्हा मी तटस्थ राहून पक्ष संघटना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे होते. त्यासाठी अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काम करायचे ठरवले. अजित पवारांच्या नेतृत्वात विधानसभेला सामोरे जाणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.