"होय, मला राग आहे..."; अजित पवारांविरोधात विजय शिवतारे संतापले; बारामती लढवणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:37 AM2024-03-20T11:37:24+5:302024-03-20T11:38:08+5:30
बारामतीत फक्त पवारच का, आणखी कुणी नाही का? प्रस्थापित घराणेशाहीविरोधात ही लढाई असून त्यासाठी मी उभा आहे असं विजय शिवतारेंनी म्हटलं.
भोर - Vijay Shivtare on Ajit Pawar ( Marathi News ) माझं बंड नाही, बारामती मतदारसंघात ५ लाख ५० हजार मतदार हे पवारांच्या विरोधातलं आहे. ज्यांना सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना मतदान द्यायचे नाही त्यांनी करायचे काय? त्या लोकांना लोकशाहीतील हक्क बजावण्यासाठी मी बारामती निवडणूक लढवणार आहे. जनतेच्या आग्रहामुळे मला उभं राहावं लागतंय. त्यामुळे मला बंडखोर म्हणू नका. पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केले.
विजय शिवतारे म्हणाले की, पवारांमुळे भोरचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाला नाही. युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी प्रामाणिकपणे सांगितले, माझी पंतप्रधानांवर निष्ठा आहे. युतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे या मताचा मीदेखील आहे. अजित पवार ही जागा जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. मग ती जागा जिंकणारच नसतील तर मी जे पवार कुटुंबाच्या विरोधात जे आहेत त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर का करू नये असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच वैयक्तिकपणे मी अजित पवारांना माफ केले आहे. पण अजितदादांची गुरमी जाणार नाही. २०१४, २०१९ मध्ये मी लोकसभा निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते. जानकारांऐवजी मला तिकीट मिळाले असते तर मी त्याच वेळी निवडून आलो असतो. बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही. बारामतीत फक्त पवारच का, आणखी कुणी नाही का? प्रस्थापित घराणेशाहीविरोधात ही लढाई असून त्यासाठी मी उभा आहे असं विजय शिवतारेंनी म्हटलं.
दरम्यान, बारामतीत नमो रोजगार मेळाव्यावेळी मी गेलो होतो, तिथे मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री यांच्यासाठी बुके आणला होता. पण अजित पवारांमध्ये कुठलीही माणुसकी नाही. इतका गर्व आहे त्यांनी बुके घेतला आणि बाजूला गेले. आज माझ्यावर प्रेम करणारी लाखो लोक आहेत. मी माझा प्रयत्न केला होता. गुंजवणी धरणासाठी मी उपोषण केले तेव्हा पालकमंत्री असूनही ते आले नाहीत. मरतोय तर मरू दे हे बोलणारे, दुर्दैवाने माझी त्यात किडनी गेली, मृत्यूला कवटाळून परत आलेला माणूस आहे. कदाचित देवाने मला यासाठी पुढे आणले असावे. निधी वाटपात कायम दुजाभाव, विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कायम खालच्या पातळीवर केले हा राग माझ्या मनात कायम असणार आहे असंही विजय शिवतारे यांनी सांगितले.